Join MultiplyOpen a Free ShopSign InHelp
MultiplyLogo
SEARCH

धुंद रवीचं बेधुंद जग

Category:Other

भैरवी..???? पण भैरवी म्हणजे मैफ़ल संपताना छेडलेले शेवटचे सूर असतात ना..? आणि आत्ताशी तर ४५ बावनखणी झाल्यात म्हणजे अजुन ७ बाकी आहेत. मग भैरवी कशी…??????

सांगतो....

काही क्षण इतकेच भारावलेले असतात की असे उत्कट क्षण म्हणजे एक मैफ़लच असते. आणि अशाच अनेक रंगलेल्या मैफ़लींनी मोहरुन जातं आयुष्य.
यातली एखादी मैफ़ल अशी काही रंगत जाते की सरणा-या रात्रीचं भानच राहत नाही. पण पहाटेची जाणीव व्हायला लागते आणि मग इतका वेळ तृप्त सूरात बुडलेली रात्र श्वासात एक अस्वस्थता मिसळून जाते. ‘अजुन आहेत थोडे क्षण बाकी... घेऊ जगुन’ असं म्हणुन आपण स्वतःचीच समजूत काढतो आणि ही मैफ़ल कधी संपूच नये असं वाटत असतानाच, अचानक भैरवीचे सूर मैफ़लीत सांडू लागतात.


अचानक संपलेल्या अशा मैफ़ली नेहमीच एक अनामिक पोकळी सोडून जातात आणि पुन्हा एकदा तीच मैफ़ल जगल्याशिवाय ती पोकळी भरलीच जात नाही....!


मी छेडलेल्या ‘बावनखणी’ मैफ़लीचंही असंच थोडंसं. खरं तर अजुन सात लेख बाकी आहेत; पण आजच, पहाट होण्यापुर्वीच भैरवी छेडतोय. माझ्या वाचकांच्या ईपत्रपेटीत (आणि कदाचीत मनातही) बावनखणीच्या जागी एक पोकळी असेल, हे माहित असुनही.


गेले ४५ आठवडे... एकही आठवडा न थांबता अविरत लिहु शकलो ते तुमच्यामुळेच. तुमची मिळणारी दाद इतकीच भरुन राहायची की ही मैफ़ल ‘न जगणं’ शक्यच नव्हतं. आणि म्हणुनच आता शेवटचे काही लेख राहिलेत तसा फार बेचैन झालोय. वाटतय.. ही पहाट होऊच नये.. श्रोत्यांनी उठुन जाऊच नये... त्यांना बांधुन ठेवावं.. इथेच... मैफ़लीत.
आणि उरलेल्या बावनखणी माझ्याच जवळ राखून हेच तर करतोय मी.


पण मग त्या उरलेल्या सात सूरांचं काय..? त्या सात बावनखणींचं काय...?
झाल्यात लिहुन. आणि तरिही त्या न पोहचवुन काय त्रास होतोय ते माझं मलाच माहित. माझ्या ह्या मैफ़लीतले हे ५२ सूर सतत तुमच्या आसपासच घुटमळत राहावेत... माझ्या लेखांचे गंध सतत दरवळत राहावेत म्हणुन ते ब्लॉगवर ‘अपलोड’ न करता कागदावर ‘उतरवायचं’ ठरवलय.

हो.... बावनखणीचं पुस्तक काढावं म्हणतोय.


तुम्ही सगळे बावनखणी वाचताच, पण आपल्याच घरात अशीही काही मंडळी असतील ज्यांना ई-बुकापेक्षा ‘छापील’ पुस्तकंच जास्त सोईस्कर वाटतात. त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहचवु शकलात तर तुमचा ऋणीच राहीन. आपल्या ह्या पुस्तकात असतील आत्तापर्यंतच्या सगळ्या कमाल बावनखणी... काही नविन धमाल बावनखणी.... आणि व्यंगचित्राच्या रुपानी सजीव झालेली चाळीतलीच काही पात्र. (...अर्थात यात ढमढेरे वहिनी असणारच.)

"आयुष्य समारंभासारखं जगता आलं पाहिजे" ...असं एकदा ढमढेरे वहिनी म्हणाल्या होत्या. त्यांचं ऐकुन सगळे बावनखणी क्षण मी समारंभासारखे जगलो. आणि आता तर हे क्षण एकत्र गुंफण्याचा सोहळा समारंभपुर्वकच झाला पाहिजे.. हो ना??
मुहुर्त ०१ जानेवारी २०१२ चा शोधलाय. कार्यालय पण राखून ठेवलय. आता प्रकाशक बघतोय. असेल एखादं चांगलं स्थळ तर जरुर सुचवा. आपल्या घरचंच कार्य आहे आणि तुमच्याशिवाय तडीस जाणे नाही. तुमच्या भरवश्यावर आहे मायबाप वाचक... सोबत रहा.


गेले वर्षभर बावनखणी लिहताना ‘लिहीण्याचं’ समाधान मिळालं... सृजनतेचा आनंद मिळाला... आणि वाचकांच्या कौतुकानी, प्रेमानी तृप्त केलं. न चूकता प्रत्येक बावनखणीला उत्तर पाठवणारे अनेक वाचक मिळालेच; तसंच ‘सविस्तर उत्तर देऊ’ असं म्हणुन लिहायचं राहिलेल्या, पण भेटल्यावर पाठ थोपटणा-या वाचकांची तर मोजदादच नाही.

तुमच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. तुमच्याशिवाय हे ध्येय गाठणंही शक्य नव्हतं. सगळ्यांचे आभार.. अगदी मनापासुन !!!

‘बावनखणी नसल्याची सगळ्यात मोठी खंत की आता ढमढेरे वहिनी नसतील’ ....असा विचार करत असाल तर काळजी करु नका. ढमढेरे वहिनी असणार आणि असणारच!! त्यांच्याशी कधी गप्पा माराव्याशा वाटल्या, कधी भेटावसं वाटलं तर कधीही या.
http://www.facebook.com/people/ढमढेरे-वहिनी/100002713358131 इथे भेटतीलच वहिनी. आणि काही खाजगी प्रश्न असले ज्याची उत्तरं मिळत नाहीयेत, काही सल्ल्यांची गरज असेल तर dhamdhere.vahini@gmail.com इथे बिनधास्त एक पत्र टाका. असतील तिथुन धावत येतील तुमच्यासाठी. आणि त्याही तुम्हाला miss करणारच की...! त्याही तुमच्या ईमेलची वाट पाहतीलच.


बावनखणीचं शेवटचं पत्र लिहताना फार जड वाटतय.... पण आनंदही आहेच. ‘माझं हे पुस्तक घ्यायला तुम्हाला आवडेल ना?’ हे तर कळवाच, पण ‘लिहु निवांत’ असा विचार करुन कधी काही लिहलंच नसेल तर हीच वेळ.... न विसरता कळवा.
......कायमचे कोरले जातील तुमचे शब्द या बावनखणी क्षणांवर !

पुढच्या आठवड्यापासुन माझ्या बावनखणीच्या मेल्स तुमच्या मेलबॉक्स मध्ये नसतील. अगदीच राहवलं नाही तर मध्ये टाकेनही एखादी बावनखणी. तुम्हालाही चुकल्या चुकल्या सारखं झालं तर कळवाच.


तुमच्या प्रतिसादाची वाट बघतोय. तुम्ही तो द्याल याची खात्री असल्यानं जास्तच वाट पाहिन..!
तुमचं प्रेम आहेच... आणि लोभही असाच ठेवा.


धुंद रवी.

Add a Comment
How would you rate this thing? (optional)
0 out of 5 stars